अकबर बिरबल मराठी गोष्टी – Akbar Birbal Marathi Goshti

Akbar Birbal Marathi Goshti – अकबर बिरबल मराठी गोष्टी

अकबर बिरबल मराठी गोष्टी येथे वाचा

अप्सरा आणि हडळ (Akbar Birbal Goshti Marathi)

बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी बादशहाने त्याला विचारले, ‘बिरबल, तू कधी अप्सरा पाहिली आहेस काय?’ बिरबल म्हणाला, ‘महाराज, मी तर दररोज एका अप्सरेला पाहतो, बादशहा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले. ‘काय रे,तू हडळ पाहिली आहेस का?

बिरबल पुन्हा म्हणाला, ‘होय महाराज, मी हडळ सुद्धा आपल्याच राजधानीत पाहिली आहे.’

बादशहाने विचार केला, हा बिरबल आपल्याला खोटी उत्तरे देऊन केवळ मनोरंजन करीत आहे. अप्सरा व हडळ या काही मनुष्ययोनीत नसतात. त्या ह्याने कशा काय पाहिल्या. बिरबलला उद्देशून बादशहा मोठयाने म्हणाला, ‘जर तू माझा वजीर व दरबारी सरदार असून अप्सरा व हडळ पाहिली आहेस तर या राज्याचा मी मालक असल्याने मलासुद्धा अप्सरा व हडळ दाखविणे तुझे कर्तव्य आहे.’ बिरबल म्हणाला, ‘महाराज, आपले म्हणणे योग्यच आहे. मी आज संध्याकाळी अप्सरा व हडळ यांचेसह आपल्या महाली येईन.

बादशहा मोठया उत्सुकतेने संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. संध्याकाळ झाल्यावर बिरबल दोन स्त्रियांसह बादशहाच्या महालात दाखल झाला. बादशहासमोर येताच त्याने त्यातल्या अशक्त व काळ्या रंगाच्या धर्मपत्नीला पुढे बोलावून सांगितले, ‘महाराज ही माझी पत्नी अप्सरा आहे.

बादशहा म्हणाला, ‘तुझी पत्नी तर खूपच काळी व अशक्तसुद्धा आहे. अप्सरा तर फार सुंदर असतात.’बिरबल म्हणाला ‘महाराज या माझ्या धर्मपत्नीत अनेक गुण आहेत. तिला माझी कोणतीही गोष्ट चुकीची वाटत नसल्याने माझ्या सर्व चुकांना ती माफ करुन माझी रात्रंदिवस सेवा करते. अप्सरापण किंवा देखणेपण काही रूपावर अवलंबून नसते. जी सर्वात जास्त गुणवान तिच अप्सरा व हयाच अप्सरेला मी दररोज पाहतो.’

बिरबल नंतर खूण करुन दुसऱ्या स्त्रीला समोर बोलावले व म्हटले, ‘महाराज ही हडळ आहे.’ बादशहा या स्त्रीच्या रुपसौंदर्याकडे पाहतच राहिला. तो म्हणाला. अरे ही तर खूपच सुंदर स्त्री आहे.

बिरबल म्हणाला, ‘महाराज, ही तर वेश्या आहे. हडळ ज्याला लागते त्याचे सर्वस्व ती हरण करते. वेश्यासुद्धा प्रेमाचे खोटे नाटक करुन सर्व लुटून घेतात.’ बिरबलाच्या स्पष्टीकरणाने अवाक् झालेल्या बादशहाने न बोलताच मान हलवून आपली संमती व्यक्त केली.

तात्पर्य : दिसते तसे नसते म्हणून आपन दिसणाऱ्या गोष्टीवर विचार करून विश्वास ठेवावा.

लाकूडतोड्या आणि न्हावी (Akbar Birbal Marathi Bodhkatha)

दिल्ली शहरात एक न्हावी आपल्या बोलण्यात लोकांना अडकवून फसवत असे. त्याच्या या चहाटळ व लबाड स्वभावामुळे सर्वजण त्याचेपासून दूर राहात. एकदा एक लाकूडतोडया डोक्यावर मोळी व मोळीवर कु-हाड ठेवून रस्त्याने जात होता.

न्हाव्याने त्याला हाक मारली व विचारले, ‘ए मोळीवाल्या, तुझ्या डोक्यावरच्या सर्व लाकडाची काय किंमत आहे?’लाकूडतोड्या म्हणाला, ‘मी आठ आणे घेईन.’ न्हावी कुचेष्टेने हसून म्हणाला, ‘अरे काय तुझ्यासकट किंमत सांगतोयस काय? ला फक्त तुझ्या डोक्यावरच्या लाकडांची किंमत सांग.’

लाकूडतोड्या न रागावता म्हणाला, ‘सहा आणे द्या’ न्हाव्याने बरीच धासाधीस करुन चारच आणे द्यायचे कबूल केले. लाकूडतोड्याने मोळी न्हाव्याच्या अंगणात टाकून चार आणे मागितले.

न्हावी म्हणाला, ‘हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?’ लाकूडतोडयाने गयावया करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हावी म्हणाला, ‘तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवा आहे.

लाकूडतोड्या म्हणाला, ‘मालक, तुम्हाला कु-हाडीचा दांडा दिला तर मी लाकडे कशी काय तोडू? उद्या माझे पोट कसे भरणार?’न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन अशीच बोली ठरली होती म्हणून ओरडून सांगितले.

बिचारा गरीब लाकुडतोडया हतबुद्ध झाला. त्याने बिरबलाकडे जाऊन तक्रार केली. बिरबल हसला. लाकूडतोडयाला तो म्हणाला, ‘काही चिंता करू नको. तुझा कु-हाडीचा दांडाही तो परत करेल व जन्मभर खजिल होईल अशी त्याची फजितीही करतो. बिरबलने लाकूड तोड्याल एक युक्ति सांगितली व परत पाठवले.

दोन चार दिवसांनी लाकूडतोड्या सकाळीच न्हाव्याच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला. तो न्हाव्याला म्हणाला, आज संध्याकाळीच माझे लग्न आहे. तेव्हा माझी व माझ्या मित्राची गुळगुळीत दाढी व हजामत करून द्या. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी जरुर देईन.’न्हाव्याला वाटले, बरे झाले. चांगला अडकला बोलण्यात, मी म्हणेन तेवढे पैसे द्यायला कबूल झाला आहे. हजामती झाल्या की चांगली मोठी रक्कम वसूल करतो तो लाकूडतोड्याला म्हणाला, ‘ठीक आहे.

मी तुझी व तुझ्या मित्राची हजामत करतो पण तू मी मागेन तेवढे पैसे द्यायचे कबूल केले आहेस हे मात्र विसरू नको.’ न्हाव्याने लाकूडतोडयाला समोर बसवले. त्याची दाढी व हजामत केली. नंतर म्हणाला, ‘कुठे आहे तुझा मित्र? लवकर बोलाव.’

लाकूडतोडयाने बाहेर जाऊन कान धरुन आपले गाढव आणले व म्हणाला, ‘हाच माझा मित्र, कर याची हजामत’ न्हावी संतापला. दोघांचे भांडण झाल्यावर ते दोघे बिरबलाकडे आले. बिरबल म्हणाला, ‘जर बोली ठरल्याप्रमाणे तू कुन्हाडीचा दांडासुध्दा घेतो तर बोली टाकतो.’ ठरल्याप्रमाणे तुला आता गाढवाची हजामत करायला हवी.

नाहीतर मी तुला तुरुंगात न्हाव्याचा नाईलाज झाला व शेवटी त्याने मान खाली घालून गाढवाची हजामत केली. ते पहायला प्रचंड गर्दी गोळा झाली व सर्वजण पोट धरून हसू लागले.

हजामत आटोपल्यावर लाकूडतोडयाने त्याला म्हटले, ‘आता बोलीप्रमाणे तू खुशाल हवे तेवढे पैसे माग.’समोर बिरबल आणि खूप लोक हसत उभे होतेच. ते पाहून न्हावी म्हणाला, ‘नको, माझी चूक झाली. त्याची मला शिक्षा झाली. मला तुझ्याकडून पैसे नको’ असे म्हणून आपली घोपटी उचलून तो घाईघाईने तेथून पसार झाला.

तात्पर्य : कधीही स्वतःला खूप शहाणे समजू नये.

योगीराज पोपट – Akbar Birbal cha Goshti

परराज्याच्या मोहिमेवरून परत येत असताना अकबर बादशहाला अचानकपणे वाटेवर एक पोपट गवसला. बादशहाने एक पिंजरा आणून त्यात पोपट ठेवला व दररोज तो स्वत:चे देखरेखीखाली पोपटाला स्वादिष्ट अन्न व फळे खाऊ घाली.

दिल्ली शहरात परत आल्यावर एक स्वतंत्र नोकर नेमून बादशहाने त्याच्यावर पोपटाची जबाबदारी सोपवली. बादशहाने नोकराला ताकीद देताना सांगितले, ‘हे बघ, या पोपटाची नीट काळजी घे. दक्षतापूर्वक त्याला खाऊ-पिऊ घाल. जर का तो आजारी पडला किंवा मेला असे माझ्याकडे सांगायला आलास तर तुझेच डोके उडवले जाईल.’

नोकराने बादशहाच्या सांगण्याचा धसकाच घेतला व सारखी काळजी करत पोपटाला खाऊपिऊ घालण्याकडे लक्ष देऊ लागला. नोकराच्या सततच्या खाऊपिऊ घालण्यामुळे पोपटही आयताच सोकावला व तो दिवसभर चरू लागला.

पोपट उपाशी राहू नये म्हणून नोकर त्याला जास्तीत जास्त अन्न देत असे. या सततच्या जास्ती खाण्यामुळेच पोपट आजारी पडला. तरीही नोकराने त्याला भरपूर अन्न देणे चालूच ठेवले. सवयीमुळे पोपट आजारी असुनही खात राही. यामुळे एके दिवशी पोपटाची तडफड सुरू झाली व शेवटी आजारी स्थितीत त्याने प्राण सोडले.

पोपट मेला म्हणजेच आता आपलेच मरण ओढावले या विचाराने नोकराला घाम फुटला.आता बादशहाला सांगण्याची तर त्याची हिंमतच नव्हती. यावर उपाय म्हणून तो बिरबलाकडे गेला.

बिरबलाला सर्व हकिकत सांगून त्याने बिरबलाचे पाय धरून प्राण वाचविण्याची विनंती केली. बिरबल म्हणाला, ‘तू आता पिंजऱ्यातच पोपटाची चोच आकाशाच्या दिशेला वळवून ठेव व पिंजऱ्यापासन दूर निघून जा. त्यापुढे काय करायचे ते मी करेन.’

बिरबल बादशहाकडे गेला व म्हणाला, महाराज आपला लाडका पोपट यापुढे बिरबल काही सांगेना… बादशहा म्हणाला ‘अरे. असे अर्धवट काय बोलतोस? माझ्या लाडक्या पोपटाला काही झाले का?'”छे! छे! सरकार, आपल्या पोपटाला काही झाले नसून तो आता एक फार मोठा योगी झाला आहे.’

बादशहाने हे बिरबलाचे उद्गार ऐकल्यावर त्याला हसू आले. तो म्हणाला. ‘बिरबल पक्षी कधी योगी होतात का? नेमके काय झाले सांग पाहू !’ बिरबलाने सांगितले, ‘सरकार, मी खरे तेच सांगतोय. आकाशाकडे चोच करुन. डोळे मिटून तो शांतपणे ध्यान करतोय.’

बादशहा दचकला, ‘अरे तो मेला तर नाही?’ बिरबलने तत्परतेने सांगितले, ‘नाही, नाही. तो तर तप करतोय.’ बादशहाचा काही बिरबलवर विश्वास बसला नाही. बिरबलाला सोबत घेऊन बादशहा लगबगीने पोपटाच्या पिंजऱ्याकडे निघाला.

पिंजऱ्याजवळ येताच बादशहाने ओळखले की पोपट मरण पावला आहे. बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘बिरबल, तू एवढा बुद्धिमान असूनही तुला एक पक्षी मरण पावला एवढेसुध्दा ओळखता येऊ नये? अरे हा पोपट मेला आहे.’

बिरबलाच्या चेहेऱ्यावर मिस्किल हास्य पाहून बादशहा बोलायचे थांबला. त्याने विचारले, ‘ह्यात काही तरी पाणी मुरतय? पोपट मेला असे न सांगता, तो तप करतोय, योगी झाला आहे, असे सांगण्यामागे तुझा हेतू तरी काय?

बिरबल म्हणाला, ‘मी सरळ सरळ पोपट मेल्याची बातमी कशी काय सांगू? तसे सांगितले तर डोके उडवायची ताकीद तुम्हीच नोकराला दिली होती.

ते ऐकताच बादशहा खो-खो करीत हसत सुटला. तो बिरबलाला म्हणाला, ‘तू एक विद्वानच आहेस, बिरबल, अरे मी अनेकदा चुकीचे बोलून जातो हे खरे पण तू मात्र फार गमती करून माझी चूक मला दाखवून देतोस.

बिरबलाने नोकराला बोलवून आणले व त्याला बादशहाचे पाया पडून माफी मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने माफी मागितल्यावर बादशहाने त्याला हसत हसत माफ केले, हे पाहून तो नोकरही आश्चर्यचकित झाला. त्या दिवसापासून राजवाडयातील सर्व नोकरांनी आपली निष्ठा बिरबलाच्या चरणावर अर्पण केली.

रक्ताशिवाय एक शेर मांस (Akbar Birbal Stories in Marathi)

हरिदास नावाचा एक सज्जन व्यापारी दिल्ली शहरात प्रसिध्द होता.अनेक गरजू लोकांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव होता. पण त्याची ही लोकप्रियता त्याच्या शेजाऱ्याला पाहवत नसे.त्याच्या शेजाऱ्याचे नाव होते उग्रदास.

एकदा हरिदासाला अचानक आलेल्या हुंड्या सोडविण्यासाठी चार लाख रुपये कमी पडत होते.काहीही करून हुंड्या सोडवणे जरुरीचे होते. अगदी नाईलाजाने त्याने उग्रदासाचे दार ठोठावले. हरिदास आपल्या दरवाजात आलेला पाहून उग्रदासाला मनातून फार आनंद झाला. एका आठवड्याच्या मुदतीसाठी चार लाख रुपये देण्यास उग्रदास एका पायावर तयार झाला.

हरिदासाला मात्र आनंद होण्याऐवजी काही दुसराच डाव असल्याचा संशय आला. उग्रदास म्हणाला, तुम्ही माझे शेजारी आहात, तुम्हाला मी चार लाख देतो व मला तुमचे व्याज सुध्दा नको पण माझी एक अट आहे.’हरिदासाला एवढी अडचण होती की तो बोलून गेला, ‘तुम्ही अट सांगा’.

उग्रदास म्हणाला, ‘एक आठवडा माझे पैसे तुम्ही खुशाल बिनव्याजी वापरा परंतु त्यानंतर एक दिवस जरी उशिर झाला तर मी तुमच्या शरीरातले एक शेर मास काढून घेईन.’

हरिदासाला खात्री होती की आपण एका आठवड्याच्या आत जरुर पैसे परत करू शकू. हरिदासाने उग्रदासची अट कबूल केली..

दोन चार दिवसातच हरिदासाजवळ चार लाख आले. पण तेवढयात त्याला परगावी जावे लागले म्हणून त्याने आपल्या मुनिमाजवळ पैसे देउन ते उग्रदासकडे नेऊन देण्यास सांगितले. पण उग्रदासाने मुनीमाजवळून पैसे घेण्यास नकार दिला.

काही दिवसांनी हरिदास बाहेरगावाहून दिल्लीत परत आल्यावर उग्रदासने पैसे एका आठवड्यात परत मिळाले नाही म्हणून तक्रार केली. हरिदास म्हणाला, ‘मी मुनिमाजवळ दिलेले पैसे तुम्हीच घेतले नाही. चूक माझी नाही. तरीही तुम्ही म्हणाल त्या दराने मी व्याज देण्यास तयार आहे.’

उग्रदासने पैसे घेण्यास नकार दिला. ‘मला व्याज नको’ उग्रदासने उत्तर दिले, ‘ठरल्याप्रमाणे मला तुमच्या शरीरातले एक शेर मांस कापून दिले पाहिजे.’इतर व्यापारी आले व त्यांनी उग्रदासाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण उग्रदास ऐकतच नव्हता. तो सारखा हरिदासच्या मागे लागला व एक शेर मांस मागू लागला.

बिचारा हरिदास घाबरला व त्याने अकबर बादशहाचे दरबारात येउन न्याय मागितला.अकबर बादशहाला उत्तर सुचेना. शेवटी त्याने हे प्रकरण बिरबलाकडे सोपविले व न्याय देण्यास सांगितले.

बिरबलाने उग्रदासाला बोलवून घेतले. उग्रदास म्हणाला, एका आठवड्यात मला पैसे परत केले नाही तेव्हा त्यानेच मान्य केलेल्या अटीनुसार मला त्याचे एक शेर मांस मिळालेच पाहिजे.’

बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे. तू तुझ्या अटीनुसार एक शेर मांस हरिदासाच्या शरीरातून कापून घे पण जर तू मांस कापताना एक थेंब जरी रक्ताचा सांडला तर तुला व तुझ्या बायका-मुलांना फाशी दिले जाईल. कारण अटी मधे फक्त मासच आहे, रक्त ठरलेले नाही. रक्त काढण्याचा तुला अधिकार नाही.’ हे एकताच उग्रसेन नरमला व म्हणाला ,’नको, नको मला मांस नको मला पैसे परत द्या.’

बिरबल म्हणाला ते काही नाही. जी अट आहे, त्यानुसार तुला मासच मिळेल चल लवकर चाकू घे व काप मांस रक्त निघाले तर मात्र तुला फाशी आहेच.

उग्रसेनचा सर्व धीर संपला व तो बिरबलाच्या पायावर लोळण घेत म्हणाला ‘मला मांस नको व पैसेही नको मला फक्त माफ करा.’

आता बिरबल चांगलाच रागावला. तो म्हणाला, ‘कपट-कारस्थान करून दुसऱ्याच्या जीवावर उठतोस काय? ह्या दुष्टपणाची तुला शिक्षा भोगावीच लागेल.’ बिरबलाने उग्रसेनला पाचवर्षे सक्तमजूरीची शिक्षा देऊन तुरुंगात रवाना केले.

हे तुझंच डोकं ना?(Akbar Birbal Story in Marathi pdf)

कासम नावाचा नोकर नवीनच नोकरीवर लागला होता म्हणून त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी, ह्या उद्देशाने झोपेतून उठताच बादशहा त्याच्याकडे पाहून ओरडला, ”जल्दी बुलाव!”आता जल्दी बुलाव, म्हणजे ताबडतोब बोलावून आण, एवढे त्या कासमला समजले,पण कोणाला बोलावयाचे? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला

त्यावर बिरबल कासमला म्हणाला, ”काय रे,तुला जल्दी बुलाव, असे जेव्हा खाविंदांनी सांगितले, तेव्हा ते उभे होते का बसले होते? आणि त्यांच्या हाताची हालचाल कशी होती?”

कासम म्हणाला, ”जेव्हा ती आज्ञा त्यांनी मला दिली, तेव्हा ते बसले होते आणि आपला उजवा हात ते आपल्या वाढलेल्या दाढी-मिशांवरून फिरवीत होते.”
यावर बिरबल म्हणाला, ”असे ना? मग तू खुशाल केस कापणाराला त्यांच्याकडे पाठव. दाढी करून आणि मिशा कोरून ते कुठे तरी तातडीने बाहेर जाणार असतील.”
कासमने अशा प्रकारे केस कापणार्‍याला बादशहाकडे पाठवून तोही त्याच्या मागून बादशहाकडे गेला, बादशहा त्याला म्हणाला, ”कासम, मी तुला फक्त जल्दी बुलाव, असेच सांगितले, तरी तू नेमका याला घेऊन कसा काय आलास? हे तुझेच डोके ना?”
त्यावर कासम म्हणाला, ”हजूर, खरं बोलायचं तर, डोके माझेच, पण त्याला अकलेचा पुरवठा बिरबलजींच्या मेंदूने केला.”

हे पण नक्की वाचा:-

मराठी छान छान गोष्टी लहान मुलांकरिता

कष्टाळू हरीण मराठी बोधकथा

बुडबुड घागरी मराठी गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *