15+ Chan Chan Marathi Goshti – मराठी छान छान गोष्टी

मराठी छान छान गोष्टी – Marathi Chan Chan Goshti

खरे बोलणे फायदेशीर (Moral Stories marathi Goshti)

आईवडीलांचे छत्र हरपलेला निखील नावाचा एक आठ वर्षाचा चुणचुणीत मुलगा होता. आईवडील त्‍याच्‍या लहानपणीच देवाघरी गेल्‍याने तो त्‍या साठ वर्षाच्‍या आजीसोबत राहत असे. एकेदिवशी बाजार करून परत येत असताना जंगलामध्‍ये तो दरोडेखोरांच्‍या तावडीत सापडला.

एका दरोडेखोराने रागावून निखीलला विचारले,” कोण रे तू? इकडे काय करतो आहेस? बघू तुझ्या पिशवीत काय काय आहे ते?” हे ऐकून खरे तर दुसरा कोणी रडू लागला असता पण निखीलने मनात दाटलेली भिती चेह-यावर न दाखवता मोठ्या हिंमतीने त्‍या दरोडेखोराला म्‍हणाला,” हे बघा माझ्या पिशवीत काय आहे हे न बघण्‍याचे मी तुम्‍हाला पन्नास रूपये देऊ शकतो. कारण माझ्याकडे आत्ता पन्‍नास रूपये आहेत आणि ते मी माझ्या आजीला चप्पल घेण्‍यासाठी राखून ठेवले आहेत.

रानावनात, काट्याकुट्यात फिरताना माझ्या आजीला खूप कष्‍ट पडतात. ती बिचारी तिच्‍या या वयातही माझ्यासाठी कष्‍ट करत आहे. कष्‍टाने मिळवलेल्‍या पैशावर आम्‍ही दोघेही जगत आहोत. आजीने मला भरपूर कष्‍ट करण्‍याची व खरे बोलण्‍याची शिकवण दिली आहे.

तुम्‍हाला जर हे कष्‍टाचे पैसे ठेवून घ्‍यायचे असतील तर अवश्‍य घ्‍या पण मी माझे खरे बोलणे सोडणार नाही.” निखीलचे हे बोलणे ऐकून दरोडेखोर मनातून शरमले व त्‍यांनी त्‍याच्‍या बोलण्‍यातून एक धडा घेतला. दरोडे घालण्‍याचे काम त्‍यांनी सोडून दिले.

तात्पर्य: नेहमी खरे बोलावे.

परिश्रमातून सुख (Marathi Stories in Short)

एका राजाच्‍या दरबारात हि-यांचे तीन व्‍यापारी येऊन म्‍हणाले,”महाराज आम्‍ही आपल्‍या राज्‍यात मौल्‍यवान हिरे विकण्‍यासाठी घेऊन येत होतो. वाटेत डाकूंनी आम्‍हाला लुटले. आता तुम्‍ही आम्‍हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे.”

राजाने त्‍या तिघांना प्रत्‍येकी एक पोते गहू दिले व राजा म्‍हणाला,” हा गहू तुम्‍ही स्‍वत:च निवडून व दळून त्‍याचे पीठ करावे. त्‍या पीठापासून अन्न तयार करून तुम्‍ही स्‍वत: खावे किंवा गरजूला खाऊ घालावे. एक महिन्‍यानंतर मला येऊन भेटावे.” तिघांपैकी दोघे हे जरा आळशीच होते. त्‍यांनी पोत्‍यातील थोडे गहू काढून घेतले. बाकीचे गहू त्‍यांनी विकून टाकण्‍यासाठी गिरणीवाल्‍याला दिले.

तिसरा व्‍यापारी मात्र मेहनती होता. त्‍याने गव्‍हाचे पोते निवडण्‍यासाठी रिकामे केले असता पोत्‍याच्‍या शेवटी त्‍याला एक मौल्‍यवान हिरा सापडला. त्‍याने तो हिरा पैलू पाडण्‍यास दिला. एक महिन्‍यानंतर तिघेही राजाकडे गेले तेव्‍हा तिस-या व्‍यापा-याने पैलू पाडलेला हिरा राजाला भेट म्‍हणून दिला. तेव्‍हा राजा म्‍हणाला की मित्रा, हा हिरा तुझा आहे.

याला विकून जितके काही धन मिळेल त्‍यातून तुझा व्‍यापार तू सुरु कर आणि इतर दोघांच्‍याही पोत्‍यामध्‍ये असाच हिरा होता पण त्‍यांच्‍या आळशीपणामुळे त्‍यांनी तो गमावून बसले.” दोन आळशी व्‍यापा-यांना स्‍वत:ची चूक कळून चुकली पण वेळ निघून गेलेली होती.

तात्पर्य : कठोर परिश्रम करणारेच यशस्‍वी होतात. यशस्‍वी लोकांनाच सुख लाभते.

वेळेचे महत्त्व (Marathi Stories Read Online)

एक घोडे स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत होता तेव्हा त्याला दिसले की घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे,पण त्याने त्याच्यावर दुर्लक्ष केले आणि आपले काम झाले म्हणून, उद्या बसवू खिळा अस म्हणत तो निवांत राहिला.

पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले होते ते त्याला काही झाले आठवत नव्हते काही दिवसांनी त्यांच्या राज्यातील सेनापतीने लढाईवर जाण्याचे इशारे दिला मात्र तेव्हाही त्याला ही बाब लक्षात नाही आली.

लढाई च्या दिवशी रणशिंग वाजले तो घोडेस्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागे वरती पोहोचला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’

हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तेव्हा घोडे स्वाराला आपली चूक लक्षात आली होती मात्र तेव्हा वेळ गेली होती.

तात्पर्य– जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.

श्रीमंत कोण?(Marathi Stories for Kids)

मोहन हा चौथीच्या वर्गातील एक विद्यार्थी. घरची परिस्थिती अतिशय नाजूक.शाळा शिकून तो रिकाम्या वेळेत एका हॉटेल मध्ये कपबश्या धुवायची कामे करायचा. लोकांची जुनी कपडे वापरायचा.शाळेचे कपडे तर चार ठिकाणी ठिगळं लावलेली.पण एकदम स्वच्छ.

एके दिवशी वर्गशिक्षक वर्गात आले आणि विचारलं की “मुलांनो,यावर्षी स्नेहसंमेलनात,आपल्या शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदत दिली जाणार आहे. मला एक नाव सांगा बर.””सर मोहन .”वर्गातून सर्व मुलांचा सूर ऐकू आला.सरानी नाव लिहिले.पण मोहनच्या स्वाभिमानाला ठेच पोहचली.

तो उठून उभा राहिला आणि म्हणाला”सर,मी गरीब आहे हे तुम्ही कशावरून ठरवल?फाटके कपडे पाहून?माझा अभ्यास पहा.अक्षर पहा. अंकगणित पहा.पाठांतर सर्व अभ्यास पहा.मैदानी खेळातील माझं कौशल्य पहा.मग ठरवा की मी गरीब कसा?”मोहनच्या बोलण्यावर सर्व वर्ग शांत झाला. सर्वाना आपल्या बोलण्यातील चूक लक्षात आली.सर पण शांत पणे मोहन कडे पाहू लागले.

कागदावर लिहिलेले त्याचे नाव नकळत त्यांनी खोडले.चार दिवसावर स्नेहसंमेलन होते आणि तो दिवस उगवला. बक्षीस वितरण सुरू झाले.चित्रकला,वक्तृत्व,लेखन निबंध ,मैदानी खेळ,सर्व स्पर्धाचा प्रथम क्रमांकाने विजेता होता तो मोहन . सरानी मोहन चे नाव मोठ्या अभिमानाने उच्चारले.

खूप खुशीत मोहन बक्षीस घेण्यासाठी आला.नम्रपणे नतमस्तक झाला. सरानी सांगितले,की “हाच तो मोहन ,सर्व शाळेतील सर्वात गुणी,नम्र आणि ज्ञानश्रीमंत.”

तात्पर्य – कोणाचीही पारख त्याच्या गुणांवरून करावी.

स्वावलंबन (Marathi Stories with moral)

सहदेव महाराज व त्यांचे दोन शिष्य पांडुरंग व प्रताप हे दोघेजण वासोट्याच्या जंगलात फिरत होते. नागेश्वरीकडे जाण्याची वाट त्या जंगलात न सापडल्याने फिरून फिरून ते सारेजण दमले होते. अंधारूनही आले होते.

काय करावे याचा विचार सुरू असतानाच अचानक त्यांना डरकाळी ऐकू आली. वाघाच्या त्या नुसत्या डरकाळीनेच सारेजण गर्भगळित झाले.

पांडुरंग महाराजांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करू लागला. तर प्रताप झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून सहदेव महाराजांनी प्रतापचा हात धरला. ते त्याला म्हणाले, ‘अरे, पळतोस कुठे? थांब, आपण तिघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करूया. तो प्रसन्न होईल आणि मग या संकटापासून आपले रक्षण करील.’

हे ऐकून आपला हात सोडवून घेत प्रताप म्हणाला, ‘महाराज, आपणच आम्हाला स्वावलंबनाचे धडे दिलेत ना? मग जे काम आम्ही स्वत: करू शकतो त्याला परमेश्वराची, तो येण्याची आणि प्रसन्न होण्याची गरजच काय?’

तात्पर्य : प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर परिणाम शून्य.

हुशार कोंबडी (aajibaichya Marathi Goshti)

एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना.

मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येत नव्हती. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ आणि तुला योग्य औषध उपचार देईल.याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असतो जेणेकरून कोंबडी खाली येईल आणि तिला खाता येईल.

कोल्हयाचा डाव ओळखून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण माझ्या वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली उतरवणार नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली आले तर माझे प्राणच जातील.’त्यामुळे तू लांबूनच माझी तपासणी करून सांग मी त्या प्रकारे काळजी घेईल.

हे ऐकून कोल्हा समजून चुकला की कोंबडी हुशार आहे.आणि तो त्या खोपटातून उदास होऊन बाहेर आला.आणि अश्या प्रकारे कोल्ह्याला उपाशीच जंगलात जावे लागले. कोल्ह्याची झालेली फजिती पाहून कोंबडी मनातल्या मनात हसू लागली.

तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.

भिक्षा पात्र (Raja Marathi Goshti)

राजमहालाच्या दारात खुप मोठी गर्दी जमलेली होती.जवळपास पुर्ण गावच तिथे जमा झालेला होता.राजमहालाच्या दारात घटनाच तसी घडली होती…! त्या दिवशी खुप सकाळी एक साधू राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आले होते.

राजा म्हणाला, नमस्कार, आपण पहिले साधू आहात… आजच्या दिवसातले आपल्याला काय पाहिजे ते सांगा…! आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळेलच.

साधू म्हणाले, महाराज माझ्याजवडील भिक्षापात्र खुपच लहान आहे.या पात्रात येईल एवढीच भिक्षा माझ्यासाठी पुरेशी आहे.पण महाराज… आपण वचन देण्याआधीच विचार करा… आपल्याला हे जमेल का…?

साधूच्या हातातील अतिशय लहान भिक्षापात्र पाहून राजा जोरात हसून म्हणाला.हे साधू महाराज… माझ्याकडील संपत्तीची गिनती नाही… तसेच माझ्या राज्याला सीमा नाही.एवढे असुनही हे तुमच्याकडील लहानसे भिक्षापात्र भरण्यात मला काय अडचण.येणार…?

राजाने महालातील नोकरांना आदेश दिला कि… आपल्या खजिन्यातले अतिउत्तम दागदागिने मागविले, आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितले…

संध्याकाळ होत आली तरी पण ते भिक्षापात्र भरणे सुरूच होते…! राजाचा सगळा खजिना रिकामा झाला होता…!

आपल्या लाडक्या राजावर लाजिरवाणी होण्याची पाळी यायला नको म्हणून तिथल्या प्रजानेही आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्या भिक्षापात्र टाकताच गायब झाली होती.

रात्र झाली तसाच राजा साधूंच्या पायावर कोसळला आणि म्हणाला.महाराज… माझ्याकडे हे पात्र भरण्याइतके धन नाही आहे.साधू महाराज म्हणाले… राजन आपण उगाच माझा दिवस वाया घालवलात.सकाळीच जर का हे सांगितले असते तर मी पुढे गेलो असतो. साधू ने आपले भिक्षापात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून ते पुढे निघाले.तसाच राजा धावत धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून विचारायला लागला…

हे भगवंत मला फक्त एक सांगा. या छोट्याश्या भिक्षापात्रात… माझ्या राज्याचा पूर्ण खजिना रिकामा झाला… तरी पण हे भरले नाही…? या भिक्षापात्राचे असे काय वैशिष्ट्य आहे महाराज…? साधू महाराज म्हणाले… ते तर मलाही माहित नाही…! पण हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केले आहे.या कवटीतच माणसाचे मन असते असे म्हणतात.आणि मन कशानेही भरत नाही…!

निर्णय क्षमता (Marathi Goshti Sangrah)

एक बुर्बेन्स नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी एक गाढव पाळले होते.त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे…!

दोघेही अगदी आनंदाने जगत होते.एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी दुसऱ्या गावी जायचे होते…गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की…गाढवासाठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे…कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो.

गृहस्थ गावी गेले… आणि आपले काम पूर्ण करून एक महिन्यानंतर परत आले…बघतात तर… गाढव मृत्यू होऊन पडलेला आहे….! हे असे कसे घडले…?

गृहस्थ विचार करायला लागले… रस्त्याकडेला दोन्ही बाजूला भरपूर हिरवागार गवत आहे… आयुष्यभर ही खाल्ले असते तरीही ते संपले नसते… एवढे असूनही गाढव उपासी राहून का मेला असावा…? गृहस्थांना काही कळत नव्हते…! नेमके झाले असे होते की… त्या गाढवाचा निश्चयच होत नव्हता की….

पहिल्यांदा रस्त्याच्या कोणत्या बाजूचे गवत खायला पाहिजे…? या बाजूचे खायचे…? की त्या बाजूचे खायचे….?पूर्ण महिनाभर असे करता करताच गाढवाने कोणत्याही बाजूचे गवत खाल्लेच नाही आणि त्याचा भुकेने मृत्यू झाला…!

तात्पर्य : निर्णय करण्याची क्षमता नसली तर मोठे नुकसान ठरलेलेच असते.

सकारात्मक विचार ठेवा (Marathi Goshti for reading)

एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं.

पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “पडशील” तर दुस-या मुलाची आई म्हणाली, “सांभाळ, घट्ट पकडून ठेव”

खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरेन घसरून खाली पडला.मात्र दुस-या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला.

काय बरं असेल यामागचं कारण ? पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.

या उलट दुस-या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला.

स्वतः चे काम (Written Marathi Goshti)

मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता. एके दिवशी शेतकरी शेतात आला.

तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की, ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’ शेतकर्‍यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली, ‘आई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’

आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’ दुसर्‍या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्‍यांना बोलावीन.

तिसर्‍या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’

हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले, ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्‍याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.

तात्पर्य- आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल हि अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose Story in Marathi)

नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्‍मजात हुशार होते. त्‍यांच्‍या वडिलांची इच्‍छा होती की त्‍यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी सुभाषबाबू इंग्‍लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.

परंतु त्‍यांचा इंग्रजांच्‍या गुलामीला विरोध होता. त्‍यांच्‍यात राष्‍ट्रसेवेची प्रबळ इच्‍छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्‍च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्‍यागमय मार्ग होता. याचे त्‍यांच्‍या मनात अंतर्द्वंद्व चालू होते.

शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्‍यू यांच्‍याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्‍यांच्‍या वडिलांचे मित्र विल्‍यम ड्युक यांनी त्‍यांचा राजीनामा आपल्‍याजवळ ठेवून त्‍यांच्‍या वडिलांना सूचना पाठविली.

वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्‍या या कार्याकडे गौरव म्‍हणून पाहतोय. मी त्‍याची ही अट मान्‍य करण्‍यासाठी त्‍याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्‍यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्‍यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्‍यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’

विल्‍यम ड्युक अवाक् होऊन त्‍यांच्‍याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्‍यांच्‍या वडिलांनी पत्र लिहीले, त्‍यात ते म्‍हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्‍ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्‍वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्‍हता.’’
तात्पर्य- राष्‍ट्रसेवेची आवड असणारे प्रत्‍येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यासाठी उपयुक्त ठरते.

कोल्हा लांडगा आणि वाघ (Marathi moral stories)

एका शिकार्‍याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला.

नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला.

थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला.

इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.

तात्पर्य :अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.

रानटी व गावठी हंस (Marathi Goshti for kids)

एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले.

जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे. त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.

एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले.

ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य: जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.

मूर्ख डोमकावळा (lahan mulanchya marathi Goshti)

एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले.
‘गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली.

तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,” या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक डोमकावळा आहे.”
तात्‍पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.

कर्तुत्व (Chan Chan Marathi Goshti)

एका घरात एक आजी आपल्या दोन नातींसह राहत होत्या. त्यांच्या घरी एक संन्यासी पाहुणा आला. आजीने त्यांना पाहुणचार केला ते सारेजण गुप्पा मारत बसले असतानाच बातमी आली की, शेजारचे कोणी तरी मरण पावले.

आजी आपल्या नातीला म्हणाली, ‘जा ग ! पाहून ये बरं. त्याला सदगती मिळाली की दुर्गती ?’ थोड्या वेळातच नात धावत आली आणि म्हणाली ‘आजी त्याला सदगती मिळाली’ गप्पा पुन्हा सुरू झाल्या एवढ्यात आणखी कोणी तरी मरण पावले. पुन्हा तसेच घडले. यावेळी मात्र नात परत येऊन म्हणाली, ‘आता याला दुर्गती मिळाली’ न राहवून संन्याशाने त्या आजीला विचारलं.

‘हे कसं शक्य आहे ?” तेव्हा आजी म्हणाली. ‘साधी गोष्ट आहे महाराज. जो माणूस मेल्यानंतर माणसे रडतात. त्यांना त्याची पोकळी जाणवते. त्याला सदगती मिळते. तर जो मेल्यावर लोक म्हणतात. ‘जमिनीचा भार हलका झाला, पीडा गेली’ अशाला दुर्गती मिळते.

तात्पर्य : आयुष्यात असे कर्तृत्व करावे की, आपण मेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील.

आयुष्याची गुरुकिल्ली (Bal Bharati Marathi Goshti)

आयुष्यात फक्त काम उपयोगाचे नाही. फक्त विश्रांतीही हितकारक नाही. काम आणि विश्रांती यांचा मेळ घातला आला पाहिजे. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेलचे उदाहरण मोठे मार्मिक आहे. तो मोठा लेखक व तत्त्वज्ञ होता. सतत कामात असायचा.

आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायचा. सुट्टीच्या दिवशी सर्वसाधारणपणे आपण झोप घेतो, मजा करतो. पण रसेल सुट्टी-दिवशी झोपायचा नाही. तो म्हणे, “आज सुट्टी. मी रोज बसून लिहितो, चिंतन करतो. आज मी व्यायाम करेन.” म्हणून तो सुट्टीच्या दिवशी न चुकता लांब अंतर चालण्याचा व्यायाम करी.

चालून चालून दमल्यावर रत्याच्या कडेला एखाद्या दगडावर बसे. विश्रांती घेई. म्हणे, “या अशा नुसत्या बसण्यातही परमानंद आहे.” कामात बदल म्हणजे विश्रांती, हे तत्त्व रसले आचरणात आणत असे. काम-श्रम आणि विश्रांती यांचा असा समन्वय आपणाला घालता यायला हवा.

तात्पर्य : कष्ट, विश्रांती आणि मौन यांचा समतोल म्हणजे सुखी आयुष्याची सुरुवात.

हे पण नक्की वाचा :

अकबर बिरबल मराठी गोष्टी

बुड बुड घागरी मराठी गोष्ट

आजीबाईचा भोपळा मराठी गोष्ट

Marathi Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *