मराठी भारुडांच्या विषयी माहिती | Marathi Bharud Information in Marathi | Santanache Bharud | Vitthal Bharud
भारुड ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे जी कवितेच्या माध्यमातून मांडली जाते. भारुड हि लोककला जवळपास सोळाव्या शतकापासून चालत आली आहे. भारुडांच्या माध्यमातून संत एकनाथ यांनी जवळपास तीनशे भक्ती गीते रचली आहेत. भारुडांच्या माध्यमातून समाजाला अनेक संदेश देण्याचे काम केले जात. दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घटकांच्या विषयी भारूडांमध्ये सांगितले जात.
![]() |
source: http://thinkmaharashtra.com |
भारूड एखाद्या भजना सारखी गायली जातात किंवा एखाद्या भक्ती पर गितासारखे पण गायली जातात.भारुड म्हणण्यासाठी गोंधळ याचा वेष केला जातो.
तर चला पाहूया संत एकनाथ यांनी रचलेली काही प्रसिद्ध भारुडे:
१.भारुड – विंचू चावला
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
अग, ग.. विंचू चावला
देवा रे देवा.. विंचू चावला
आता काय मी करू.. विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्त्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरा
सत्य उतारा येऊन
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने
लेखक:- संत एकनाथ
२.भारुड – आंधळा
आधि देखत होतो सकळ ।
मग ही दृष्टी गेली आले पडळ ।
चालत मार्ग न दिसे केवळ ।
आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१॥
दाते हो दान करा तुम्ही संत उदार ।
चालता मार्ग दाखवा मज निर्धार ।
गुंतलो, लोभ आशा न कळे विचार ।
दृष्टी ते फिरवूनी द्या मुखी नामाचा उच्चार ॥२॥
त्रैलोक्यात तुमची थोरी पुराणे वर्णिती साचार ।
वेदही गाती तया नकळे निर्धार ।
कीर्ती गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर ।
म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥
अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार ।
तेणे पंथे चालताना फिटला मायामोह अंधार ।
एका जनार्दनी देखिला परे परता पर ।
श्री गुरु जनार्दन कृपेने दाविले निजघर ॥४॥
३.भारुड – आशीर्वादपत्र
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।
पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।
कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील ॥ २ ॥
आशा मनषा यांची संगत धरू नये ।कलम० ॥ ३ ॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे ।कलम तपसील ॥ ४ ॥
शांतिक्षमादया असो देणे ।कलम तपसील ॥ ५ ॥
ज्ञान वैराग्य – भजनपूजनी आदर ठेवणे ।कलम तपसील ॥ ६ ॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले ।
तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून ।
वाईट वागणुकीचा रस्ता काढला ।
तो तुम्हास परिणामी बाधक होईल ।
सावध रहाणे । एका जनार्दनी शरण ।
हे आशीर्वादपत्र
४.भारुड – अंबा
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥
५.भारुड – अयोध्येचा हो देव्हारा
अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥
रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू ।
सहा अठराचा पडिभारू ॥ २ ॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटिने विणिला ।
तुजलागी पांघुरविला ॥ ३ ॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा ।
एका जनार्दनी मुळा ॥ ४ ॥
६.भारुड – माझे कुळीची कुळस्वामिनी
माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासनि । ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥ १ ॥
येई पुंडलिक वरदायिनी ।विश्वजननी । रंगा येई वो ॥ धृ. ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधले ।
ज्ञान कळस वर ठेवले ।
पूर्ण भरियले । धूप दाविले दंड । सुवासे करूनि ॥ २ ॥
सभा मंडपो शोभला । भक्ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला ।रंग माजला ।
वेद बोलला । मूळचा ध्वनि ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी
मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥ ४ ॥
ऎसा गोंधळी घातिला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऎक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥ ५ ॥
७.भारुड – बहिरा जालो या या जगी
बहिरा जालो या या जगी ॥धृ. ॥
नाही ऎकिले हरिकीर्तन ।
नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्रण पठण ।
गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाही सन्तकीर्ति श्रवणी आली ।
नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली ।
तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता ।
शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता ।
एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥
८.भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई
संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥
आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥
९.भारुड – अलक्ष लक्ष मी भिकारी
अलक्ष लक्ष मी भिकारी ।
म्हणोनी आलो सद्गुरुद्वारी ।
भिक्षा मागतो नाना परी ।
कोण्ही वाचे स्मरा मुरारी ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
चार युगे करुनी फेरी ।
हिंडो सद्गुरुचे द्वारी ॥२॥
भिक्षा मागो अलक्षपुरी ।
तेणे तुटेचौर्याऎंशी फेरी ॥३॥
शरण एका जनार्दन ।
तुटले देहाचे बंधन ।
कर्माकर्माचे खंडन ।
गेले विलया जीवपणा ॥४॥
१०.भारुड – आम्ही परात्पर भिकारी
आम्ही परात्पर भिकारी ॥
वेगे आलो संताद्वारी ।
द्या मज भक्तीची भाकरी ।
म्हणूनी नाचतो नामगजरी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
युगे अठ्ठावीसांचा जोगी ।
विभूति चर्चित सर्वांगी ।
गळा अनुपम्य शैली शिंगी ।
वाजती सो हं शब्दजगी ॥२॥
त्राहे त्राहे त्राहे त्राही ।
हे तो नमगे मी काही ।
एका जनार्दनाचे पायी ।
काया वाचा मन राही ॥३॥
११.भारुड – चौदेहांची घेऊनी दीक्षा
चौदेहांची घेऊनी दीक्षा । आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष । प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही । कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख । तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग । अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥
१२.भारुड – चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा
चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा ।
दिसें रूपें रूप आगळा ।
आगमा निगम न कळे कळा ।
तोचि लक्षालक्ष लक्षु निराळा ॥१॥
बाबा बाळसंतोष ।
बाळ संतोष बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
दृश्य अदृश्य आटले ।
द्वैताद्वैत ते फिटले ।
ज्ञोय ज्ञाता ज्ञाने भेटले ।
सद्गुरुचरण लक्ष लक्षिले ॥२॥
दया क्षमा शांति विरुक्ती ।
मावळली व्यक्ताव्यक्ती।
उडॊनी गेली सकळ भ्रांती ।
जाहली संसाराची शांति ॥३॥
दान दिधल्या नुरेचि कर्म ।
निवारला भवभ्रम।
जाहलो नि:संग निष्काम ।
एका जनार्दनी विश्राम ॥४॥
१३.भारुड – अलक्ष लक्ष पाहवेना
अलक्ष लक्ष पाहवेना ।
ते कोणाचे ध्यानी बैसेना ।
योगी ध्याती जया मना ।
ते आणी पां रे आपुल्यामना ॥१॥
बाबा बाळसंतोष ।बाळसंतोष ॥धृ. ॥
अनुहात शब्द निराळा ।
सोहं सोहं त्याची कळा ।
ते न ये ध्यान मना सकळा ।
ऎशी अगम्य त्याची कळा ॥२॥
जुनी टाका देहाची अंगी ।
भाव धरा भक्ती संगी ।
विरेल देहपण अंगाचे अंगी ।
मिथ्या प्रपंच जाईल भंगी ॥३॥
एका जनार्दनी मागे दान ।
पूर्ण परिपूर्ण कळली खूण ।
सबाह्य कोंदला जनार्दन ।
देहींच विदेही जाहला पूर्ण ॥४॥
१४.भारुड – आम्ही परात्पर देशी
आम्ही परात्पर देशी ।
कोणी नोळखती आम्हासी ।
टाकून आलो संतापाशी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
जीर्ण स्वरूपाचा शेला ।
विषय भोगीता विटला ।
तो मज द्याव दाते वहिला ॥२॥
ऎकत्वाचे बिरडे जोडी ।
त्रिगुणासी कसणी फेडी ।
जुनी कांसणी रोकडी ॥३॥
पूर्णत्वाची पुरणपोळी ।
स्नेहावरील तेलवरी ।
प्रबोध लाडू तयावरी ॥४॥
एका जनार्दनी मागतादान ।
जिताची जाण जीवपण ।
शेखी दिले शिवपण ॥५॥
१५.भारुड – नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी
नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशीसंन्याशी ।
नाहं कर्मी नाहं धर्मी उदासी ना घरवासी ॥ १ ॥
बाबा अचिंत्य रे बाबा अचिंत्यरे ब्रह्मी स्फुरे सो माया ।
नाम नाही ना रूप रेखा सो भई हमारी काया ॥ ध्रु. ॥
नाहं सिद्धा नाहं भेदा नाहं पंडित ज्ञानी ।
नाहं जपी नाहं तपी नाहं ध्येय ध्यानी ॥ २ ॥
नाहं पीडा ना ब्रह्मांडा नाहं जीव शीव कोई ।
नाहं पुरूषा नाहं नारी नाहं देव विदेही ॥ ३ ॥
नाहं सद्रूप नाहं चिद्रूप नाहं आनंद भोगे
जनार्दन पुता अभिन्न एका निर्विकल्प भये अंगे ॥ ४ ॥
१६.भारुड – भूत जबर मोठे गं बाई
भूत जबर मोठे गं बाई ।
झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥
झाली झडपड करूं गत काई ।
सूप चाटूचे केले देवऋषी ॥
या भूताने धरिली केशी ॥ २ ॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥
भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥
भूत लागले ध्रुव बाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥
एका जनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥
१७.भारुड – आंधळा पांगळा
असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा ।
आपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा ।
मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा ।
शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥
संत तुम्ही मायबाप माझी राखा काही दया ।
लागतो मी वारंवार तुमचिया पाया ॥धृ. ॥
इंद्रीये माझी न चलती क्षणभरी ।
गुंतलो मायामोहे या संसाराचे फेरी ॥
अंथरूण घातले इंगळाचे शेजेवरी ।
कैशी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥२॥
मायबाप संत तुम्ही उपकार करा ।
जगी जो नांदतो जनीं जनार्दन तो खरा ॥
तयाचिया चरणावरी मस्तक निर्धारा ।
एका जनार्दनी करी विनंती अवधारा ॥३॥
१८.भारुड – आंधळा पांगळा दाते बहु असती परि
दाते बहु असती परि न देती साचार ।
मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार ।
लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार ।
तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार ।
न सरेची कल्पांती माप लागले निर्धार ।
मागणेपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ ।
माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ ।
शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥
१९.भारुड – भूत्या
भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥
२०.भारुड – चौघडा
पंधरा सतरांचा सतरांचा हा मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेम बळा आनंदे ॥ १ ॥
झडतो नामाचा चौघडा ॥धृ. ॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरूपींचा हुडा ।
संत ऎकताती कोडा । प्रेमबळा आनंदे ॥ २ ॥
जनाबाई घड्याळ मोगरी । घटिका भरिता टोलामारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदे ॥ ३ ॥
नामा दामा दोन्ही काळु । नारा विठा दमामे फैलु ।
चौघीसुना चारी हेळु । कडकडा बोल उमटती ॥ ४ ॥
गोंदा महादा करणी करी । नामे दुमदुमली पंढरी ।
आडबाई तुतार ।मंजुळ स्वर उमटती ॥ ५ ॥
गोणाबाई नौबत पल्ला । नाद अंबरी कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळस्वर उमटती ॥ ६ ॥
तेथे चौका बारी दार । काटवन विजन जाळीचे सार ।
अवघे झाडवणीमहार । एका जनार्दनीपार उतरविला ।
झडतो नामाचा चौघडा ॥ ७ ॥
२१.भारुड – चोपदार
चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥
माझे चोपदाराचे राहणे ।
आकाश स्वर्ग पाहणे ।
चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥
शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवी शून्य द्वारपाळ जाण ।
कळिकाळा टाकिन छेदून ।
रंडी चंडीशक्ती टाकीन भेदून ।
चोपदार आहे मी जाण ॥ २ ॥
आम्हांस नाही उपाय ।
आम्हांस नाही बाप ना माय ।
खरी चाकरी कोठे करावी ।
एका जनार्दनी दृढ धरावी ॥ ३ ॥
२२.भारुड – दादला
मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ।
देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी ।
शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी ।
वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार ।
नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने ।
राज्यात लेणे नाही ॥५॥
एका जनार्दनी समरस झाले ।
पण तो रस येथे नाही ॥६॥
२३.भारुड – संन्यास – अहो तुम्ही संन्यासी
अहो तुम्ही संन्यासी झाला । काम क्रोध जवळींचा नाही गेला ।
व्यर्थ का विनाश केला । सावध होई ॥ १ ॥
संसार व्यर्थ सांडिला । मुला बाळा तुटी पाडिला ।
नारायण नाही जोडीला । सावध होई ॥ २ ॥
वर वर शेंडी बोडी । जानवे तोडून धोत्रे फाडी ।
हाती घेऊनी दंड लाकडी । सावध होई ॥ ३ ॥
वर वर म्हणसी नारायण । अंतरी विषयावरी ध्यान ।
कासया संन्यास घेऊन । सावध होई ॥ ४ ॥
आता एक विचार । धरी तू संताचा आधार ।
एका जनार्दनी तत्पर । सावध होई ॥ ५ ॥
२४.भारुड – वासुदेव – सुखे सेऊं ब्रह्मानंदा
सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा ।
नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥
करू वासुदेव स्मरण । तेणे तुटे रे बंधन ।
खंडेल कर्माचे वदन । वासुदेव जपतांची ॥२॥
तीर्थायात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊं ।
संतासंगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥
लोभ ममता सोडू आशा । उदारव्यथेचा बोळसा ।
न करूं आणिक सायासा । वासुदेवावाचुनी ॥४॥
मुख्य वर्माचे हे वर्म । येणे साधे सकळ धर्म ।
एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥
२५.भारुड – पिसा – राम राम म्हणूनी
राम राम म्हणूनी सदा रडे ।
जे जे देखे त्याच्या पाया पडे ॥१॥
देव देखत पिसे पाही ।
आपले पारखे नोळखे काही ॥२॥
बोलामाजि घाली मौनाची मिठी ।
शून्याही वरील सांगतो गोष्टी ॥३॥
आपुलिया माथां आपण मारी ।
त्याच्या पिसेपणा कोण आवरी ॥४॥
एका जनार्दनी पिसा झाला खरा ।
आपुल्या आपण ताशी शरीरा ॥५॥
हे पण वाचा :-